Search This Blog

भारताचा वन अहवाल – २०१७

भारताचा वन अहवाल – २०१७ जाहीर
भारताच्या वृक्ष आणि वनक्षेत्रात २०१५ पासून तर २०१७ पर्यंतच्या दोन वर्षांच्या काळात ८,०२१ चौरस किलोमीटरने वाढ झाली आहे. भारताचा वनअहवाल २०१७ सोमवारी पर्यावरण मंत्री हर्षवर्धन यांनी प्रकाशित केला. या अहवालात गेल्या दोन वर्षांत भारताच्या वृक्ष आणि वनक्षेत्रात एक टक्का वाढ नोंदवण्यात आली आहे. प्रत्येक दोन वर्षांनी भारताचा वनअहवाल प्रकाशित केला जातो.

भारताचे एकूण वनक्षेत्र ७ लाख ८ हजार २७३ चौरस किलोमीटर आहे, जे देशाच्या एकूण भौगोलिक क्षेत्राच्या २१.५४ टक्के आहे. वृक्ष आणि वनक्षेत्र मिळून ८ लाख २,०८८ चौरस किलोमीटर म्हणजेच एकूण भौगोलिक क्षेत्राच्या २४.३९ टक्के आहे. २०१५च्या तुलनेत भारताच्या घनदाट जंगलात १.३६ टक्क्याने वाढ झाली आहे. जंगल क्षेत्रातील वाढ ६,७७८ चौरस किलोमीटर असून वृक्षाच्छादन १ हजार २४३ चौरस किलोमीटर इतके वाढले आहे. मध्य प्रदेशात सर्वाधिक ७७ हजार ४१४ चौरस किलोमीटर वनक्षेत्र असून त्यापाठोपाठ अरुणाचल प्रदेश ६६ हजार ९६४ आणि छत्तीसगड ५५ हजार ५४७ चौरस किलोमीटर वनक्षेत्र आहे. एकूण भौगोलिक क्षेत्रासंदर्भात वनक्षेत्राच्या टक्केवारीनुसार लक्षद्वीप ९०.३३ टक्के आणि त्यापाठोपाठ मिझोराम ८६.२७ टक्के तसेच अंदमान व निकोबार बेटे ८१.७३ टक्केआहे. या सर्वेक्षणात प्रथमच जलाशयांचे मूल्यांकन करण्यात आले असून गेल्या दशकात वनक्षेत्रात २ हजार ६४७ चौरस किलोमीटर वाढ झाली आहे.
दृष्टिक्षेपात महाराष्ट्रातील वनक्षेत्र
अहवालानुसार महाराष्ट्राचे एकूण भौगोलिक क्षेत्र ३ लाख ७ हजार ७१३ चौ. किमी आहे. यापैकी ५० हजार ६८२ चौ.किमी. क्षेत्र वनव्याप्त असून ते भौगालिक क्षेत्राच्या १६.४७ टक्के आहे. यात ८ हजार ७३६ चौ.किमी. हे अति घनदाट जंगल, २० हजार ६८२ मध्यम घनदाट जंगल, २१ हजार २९४ चौ. किमी विरळ जंगल तर ४ हजार १६० चौ. किमी खुरटे जंगल आहे. राज्यात एकूण ७ डोंगराळ जिल्हे असून त्यांचे एकूण भौगोलिक क्षेत्र ६९ हजार ९०५ एवढे आहे. यापैकी १५ हजार ६२० हे वनक्षेत्र असून ते २२.३४ टक्के आहे. एकूण वनक्षेत्रात अति घनदाट जंगल ३१५, मध्यम घनदाट जंगल ७ हजार २४५, विरळ जंगल ८ हजार ५९ आणि खुरटे जंगल १ हजार ४१५ चौ. किमी आहे.
पाणथळखारफुटी क्षेत्रात महाराष्ट्र आघाडीवर
या अहवालानुसार जंगलातील पाणथळ क्षेत्रात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. राज्याच्या जंगलातील पाणथळ क्षेत्र ४३२ चौ.किमी. आहे. तर ४२८ चौ.किमी. सह गुजरात दुसऱ्या क्रमांकावर आहे यादीत ३८९ चौ.किमी. सह मध्य प्रदेश तिसऱ्या क्रमांकावर आहे. देशातील खारफुटी जंगलात एकूण १८१ चौ. किमी एवढी वाढ झाली असून यात एकटय़ा महाराष्ट्राचा वाटा ८२ चौ. किमी. एवढा आहे.

Blogger Widgets